मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? | Market Capitalization in Marathi
नमस्कार मित्रांनो! आज आपण शेअर बाजारातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना, मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? (Market Capitalization in Marathi) आणि त्याचा अर्थ उदाहरणासहित समजून घेणार आहोत.
मार्केट कॅपिटलायझेशन माहिती मराठीमध्ये
मार्केट कॅपिटलायझेशन किंवा शॉर्टमध्ये ‘मार्केट कॅप’ यालाच मराठीमध्ये ‘बाजार भांडवलीकरण’ असे म्हणतात.
सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, मार्केट कॅप म्हणजे त्या कंपनीची बाजारातील एकूण किंमत होय. समजा, तुम्हाला ती पूर्ण कंपनीच विकत घ्यायची असेल, तर तुम्हाला आजच्या घडीला किती पैसे द्यावे लागतील, ती रक्कम म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन.
कुठलीही कंपनी किती मोठी किंवा छोटी आहे, हे तिच्या शेअरच्या किमतीवरून नाही, तर तिच्या ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ वरून ठरवले जाते.
(वरील इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की कंपन्यांचे आकारानुसार कसे वर्गीकरण केले जाते.)
मार्केट कॅपिटलायझेशन कसे काढतात? (Formula)
मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे मार्केट कॅप तुम्ही खालील सोप्या सूत्राच्या मदतीने काढू शकता:
मार्केट कॅप = एका शेअरची किंमत × एकूण शेअर्सची संख्या
उदाहरणार्थ: समजा ‘ABC Ltd.’ नावाची एक कंपनी आहे. तिच्या एका शेअरची किंमत 100 रुपये आहे आणि बाजारात त्या कंपनीचे एकूण 10,000 शेअर्स उपलब्ध आहेत.
आपल्या सूत्रानुसार: 100 × 10,000 = 10,00,000 (दहा लाख).
म्हणजेच, 10,00,000 रुपये ही झाली त्या कंपनीची बाजारातील एकूण किंमत किंवा व्हॅल्यू! मित्रांनो, कंपनीच्या शेअर्सची संख्या जरी फिक्स असली, तरी शेअरची किंमत रोज बदलत असते. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन सुद्धा रोज बदलत असते.
मार्केट कॅपिटलायझेशनचे प्रकार (Types of Market Cap)
मार्केट कॅपिटलायझेशनचा उपयोग करून आपण शेअर बाजारातील कंपन्यांना मुख्य 3 प्रकारांत विभागू शकतो:
1. लार्ज कॅप कंपनी म्हणजे काय? (Large Cap)
भारतातील मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने ज्या पहिल्या टॉप 100 कंपन्या आहेत, त्यांना आपण ‘लार्ज कॅप कंपन्या’ असे म्हणतो. या कंपन्या आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि स्थिर असतात, त्यामुळे यात गुंतवणूक केल्यास जोखीम (Risk) खूप कमी असते.
याची काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:
| क्रमवारी | कंपनीचे नाव | मार्केट कॅपिटलायझेशन (कोटींमध्ये) |
|---|---|---|
| 1 | रिलायन्स इंडस्ट्रीज | 16,80,705.71 |
| 2 | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) | 11,97,881.94 |
| 3 | एच.डी.एफ.सी. बँक (HDFC) | 9,31,855.87 |
| 4 | आयसीआयसीआय बँक (ICICI) | 6,59,479.70 |
| 5 | हिंदुस्तान युनिलिव्हर | 6,26,045.50 |
| 6 | इन्फोसिस | 5,99,762.80 |
(टीप: मार्केट कॅपिटलायझेशन हे शेअरच्या किमतीनुसार बदलत असते. ताज्या आकडेवारीसाठी येथे क्लिक करा.)
2. मिड कॅप कंपनी म्हणजे काय? (Mid Cap)
या प्रकारात मार्केटमधील 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्यांचा समावेश होतो. लार्ज कॅप पेक्षा या कंपन्या थोड्या लहान असतात, पण भविष्यात मोठ्या होण्याची क्षमता यांच्यात असते. यात जोखीम आणि परतावा दोन्ही मध्यम स्वरूपाचे असतात.
3. स्मॉल कॅप कंपनी म्हणजे काय? (Small Cap)
शेअर बाजारातील 251 व्या क्रमांकापासून पुढच्या सर्व लहान कंपन्या ‘स्मॉल कॅप’ मध्ये येतात. या कंपन्यांमध्ये सर्वाधिक जोखीम असते, पण जर कंपनीने चांगली कामगिरी केली, तर परतावा (Returns) सुद्धा कित्येक पटीने जास्त मिळू शकतो.
महत्त्वाची टीप: कंपनी निवडताना कधीच फक्त शेअरची किंमत पाहू नका. 10 रुपयांचा शेअर स्वस्त आणि 1,000 रुपयांचा शेअर महाग असतो, असा गैरसमज करून घेऊ नका. खऱ्या अर्थाने कंपनी किती मोठी आहे हे पाहण्यासाठी तिचे ‘मार्केट कॅप’ तपासा.
याच मार्केट कॅपच्या विभागणीवरून म्युच्युअल फंडांचे विविध प्रकार पडतात, ज्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? या लेखात दिली आहे.
- कंपनीची कामगिरी: कंपनीची नफ्यातील वाढ आणि कामगिरी जेवढी चांगली असेल, तेवढी तिच्या शेअरला मागणी वाढते व पर्यायाने मार्केट कॅप वाढते.
- गुंतवणूकदारांचा कल (Sentiment): जर एखाद्या कंपनीवर गुंतवणूकदारांचा विश्वास असेल आणि ती चांगला परतावा देत असेल, तर तिथे पैशांचा ओघ वाढतो.
- मार्केटचा मूड आणि दिशा: शेअर बाजार जर तेजीत (Bull Market) असेल, तर गुंतवणूकदारांचा खरेदीकडे जास्त कल असतो, ज्यामुळे एकूणच सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप वाढते.
- कंपन्यांमधील स्पर्धा: ज्या कंपन्या स्पर्धेत टिकून राहतात आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करतात, त्या गुंतवणूकदारांना नेहमी आकर्षित करतात.