Equity Mutual Funds in Marathi : नमस्कार मित्रांनो! आज आपण या लेखामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यास घाबरत असाल, तर इक्विटी म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
सर्वात आधी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या मूलभूत गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर आमचा म्युच्युअल फंड म्हणजे काय? हा लेख नक्की वाचा.
इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? (Equity Mutual Funds Meaning in Marathi)
इक्विटी म्युच्युअल फंड हा असा म्युच्युअल फंड आहे, ज्यामध्ये लोकांकडून जमा केलेले पैसे थेट शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही या फंडला दिलेले पैसे फंड मॅनेजर कंपन्यांचे हिस्से (Equity) खरेदी करण्यासाठी वापरतो.
जशी कंपनीच्या शेअरची किंमत वाढते, तसा तुमचा परतावा (Returns) वाढतो. यामध्ये तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर स्वतः निवडण्याऐवजी, तो निवडण्याचे काम प्रोफेशनल ‘फंड मॅनेजर’वर सोपवता. हे एखाद्या कंपनीचे शेअर्स स्वतः खरेदी करण्यासारखेच आहे, पण इथे तुम्हाला कंपनीचा तांत्रिक अभ्यास करण्याची गरज नसते.
एका इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये साधारणपणे ५० ते ८० कंपन्यांचा समावेश असू शकतो. तुम्ही ५०० रुपये जरी गुंतवले, तरी ते त्या सर्व कंपन्यांमध्ये विभागले जातात. यामुळे तुमची जोखीम (Risk) कमी होते.
इक्विटी म्युच्युअल फंडाचे प्रकार (Types of Equity Mutual Funds)
मार्केटमधील कंपन्यांच्या आकारावरून आणि गुंतवणुकीच्या पद्धतीवरून इक्विटी फंडाचे अनेक प्रकार पडतात. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मार्केट कॅपिटलायझेशन (बाजार भांडवलीकरण) म्हणजे काय हे माहित असणे गरजेचे आहे.
१. लार्ज-कॅप इक्विटी म्युच्युअल फंड (Large-Cap Funds)
या फंडमध्ये किमान ८०% गुंतवणूक देशातील सर्वात मोठ्या (Top 100) कंपन्यांमध्ये केली जाते. या कंपन्या मोठ्या आणि स्थिर असल्यामुळे यात जोखीम कमी असते आणि स्थिर परतावा मिळतो.
२. मिड-कॅप इक्विटी म्युच्युअल फंड (Mid-Cap Funds)
मिड-कॅप फंडमध्ये किमान ६५% गुंतवणूक मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये केली जाते. या कंपन्या भविष्यात लार्ज-कॅप होण्याची क्षमता ठेवतात, त्यामुळे यात लार्ज-कॅपपेक्षा जास्त परतावा मिळतो, पण जोखीम थोडी जास्त असते.
३. स्मॉल-कॅप इक्विटी म्युच्युअल फंड (Small-Cap Funds)
यात किमान ६५% गुंतवणूक लहान कंपन्यांमध्ये केली जाते. स्मॉल-कॅप फंडमध्ये जोखीम सर्वाधिक असते, पण जर कंपनीने चांगली कामगिरी केली तर परतावा देखील प्रचंड (Multibagger) मिळू शकतो.
(वरील फोटोत तुम्ही पाहू शकता की योग्य स्मॉल-कॅप फंड निवडल्यास किती चांगला परतावा मिळू शकतो.)
४. मल्टी-कॅप आणि फ्लेक्सी-कॅप फंड
- मल्टी-कॅप: SEBI च्या नियमानुसार, यात लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये प्रत्येकी २५% गुंतवणूक करणे अनिवार्य असते.
- फ्लेक्सी-कॅप: यात फंड मॅनेजरला पूर्ण स्वातंत्र्य असते की त्याने कोणत्या आकाराच्या कंपनीत किती पैसे गुंतवावे. यात लवचिकता जास्त असते.
५. इतर विशेष प्रकार
- Thematic/Sectoral Funds: जे एका विशिष्ट क्षेत्रावर (उदा. बँकिंग, आयटी) लक्ष केंद्रित करतात.
- ELSS (Tax Saver): ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता.
इक्विटी म्युच्युअल फंडचे फायदे
१. महागाईवर मात करणारा परतावा
इक्विटी म्युच्युअल फंडने दीर्घकाळात (१०+ वर्षे) सरासरी १२% ते १५% किंवा त्याहूनही अधिक परतावा दिला आहे. एफडी (FD) किंवा सोन्याच्या तुलनेत हा परतावा अधिक असतो.
२. गुंतवणुकीचे विविधीकरण (Diversification)
तुम्ही एसआयपी (SIP) द्वारे ५०० रुपयांपासून सुरुवात करून अनेक बड्या कंपन्यांचे मालक बनू शकता. तुमचे पैसे ५०-८० कंपन्यांत विभागले गेल्यामुळे एक कंपनी बुडली तरी तुमच्या एकूण गुंतवणुकीवर मोठा परिणाम होत नाही.
३. प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट
तुमचे पैसे शेअर मार्केटमधील तज्ज्ञ व्यक्ती (Fund Manager) सांभाळतात. त्यांच्याकडे डेटा आणि तज्ज्ञांची टीम असते, ज्यामुळे तुम्हाला स्वतः मार्केटचा अभ्यास करण्याची गरज राहत नाही.
४. लिक्विडिटी आणि सुलभता
तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कधीही पैसे काढू शकता किंवा गुंतवणूक वाढवू शकता. गुंतवणुकीसाठी तुम्ही SIP किंवा लंपसम यांसारख्या सोयीस्कर पद्धती वापरू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न: इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किमान किती काळ गुंतवणूक करावी?
उत्तर: चांगल्या परताव्यासाठी इक्विटी फंडमध्ये किमान ५ ते ७ वर्षे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.
प्रश्न: मार्केट पडले तर माझे पैसे शून्य होतील का?
उत्तर: नाही. तुमचे पैसे एका कंपनीत नसून अनेक कंपन्यांत विभागलेले असतात. मार्केटमध्ये चढ-उतार येतात, पण दीर्घकाळात मार्केट नेहमी वरच जाते.
प्रश्न: परताव्यावर टॅक्स लागतो का?
उत्तर: होय, १ वर्षाच्या आत पैसे काढल्यास १५% (STCG) आणि १ वर्षानंतर १ लाखापेक्षा जास्त नफा झाल्यास १०% (LTCG) टॅक्स लागतो.
(टीप: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. अधिक माहितीसाठी सेबी (SEBI) च्या संकेतस्थळाला भेट द्या.)