क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डविषयी सविस्तर माहिती
नमस्कार मित्रांनो आज आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डविषयी सविस्तर माहिती सोबतच त्यांचे फायदे तोटे आणि त्यांच्यातील फरक या लेखातून जाणून घेणार आहोत.
डेबिट कार्डविषयी सविस्तर माहिती
डेबिट कार्डची संकल्पना व वैशिष्ट्ये
मित्रांनो डेबिट कार्ड हे इलेक्ट्रोनिक चिप असलेले कार्ड असते ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या चालू बँक खात्यातील किंवा बचत खत्यातील व्यवहार कुठल्या ही ATM मशीन मध्ये जाऊन करू शकता.
या व्यतिरिक्त डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग, बिल पेमेंट या सारख्या गोष्टी ही करू शकता.
डेबिट कार्डचा वापर करण्यासाठी अगोदर तुमच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे असणे गरजेचे असते.
डेबिट कार्ड कसे मिळवावे?
मित्रांनो आजकाल आपण बँक अकाऊंट उघडताना जो अर्ज करतो त्या अर्जातच आपल्याला डेबिट कार्ड साठीचा पर्याय पाहावयास मिळतो.
तरी पण समजा तुमचे जुने खाते आहे आणि तुम्हाला डेबिट कार्ड हवे आहे, तर तुम्ही नवीन डेबिट कार्डसाठी तुमच्या जवळच्या शाखेमध्ये अर्ज करू शकता.
तुमच्या बँकेत जाऊन नवीन डेबिट कार्ड साठीचा अर्ज मागून घ्या. त्यात तुमची बेसिक माहिती जसे की नाव, अकाऊंट नंबर, पत्ता अशी माहिती भरा.
सोबत महत्वाचे कागदपत्रे जोडा आणि तुमच्या अर्ज बँकेकडे जमा करा. काही दिवसात तुमचे डेबिट कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोच होईल.
डेबिट कार्डचे फायदे व तोटे
डेबिट कार्डचे फायदे
- सोईस्कर- डेबिट कार्ड वापरणे खूपच सोपे आणि सोईस्कर ठरते. कुठला ही आर्थिक व्यवहार तुम्ही बँकेत न जाता करू शकता. यात तुम्हाला बँकेच्या वेळेचे बंधन राहत नाही.
- सुरक्षितता- मित्रांनो डेबिट कार्ड हे पिन आणि सीव्हीव्ही चा वापर करते. सोबतच ते हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तुम्ही त्वरीत त्याल ब्लॉक करू शकता.
- व्यवहार पडताळणीत सुलभता- मित्रांनो डेबिट कार्डचा वापर करून केलेल्या प्रतेक व्यवहाराची नोंद तुमच्या बँक स्टंटमेंट मध्ये होत असते. म्हणून तुम्ही कोठे, किती, कशासाठी पैसे खर्च केले याचा तपशील तुम्हाला अगदी सहज मिळून जातो.
- बोनस आणि ऑफर- अनेक बँका डेबिट कार्ड वापरावर खूप सारे रिवॉर्ड पॉईंट्स आणि ऑफर देत असतात. तसेच ऑनलाईन खरेदी मध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात सूट पण मिळते.
- सुलभ- पैसे रोख रक्कमेच्या स्वरूपात बाळगण्यापेक्ष्या ते आपल्या बँक अकाऊंट मध्ये ठेऊन त्यांचा वापर डेबिट कार्डच्या माध्यमातून करणे हे सुलभ आणि सुरक्षित ठरते.
- खर्चावर नियंत्रण- डेबिट कार्डचा वापर केल्याने आपल्याला हवी तेव्हडीच रक्कम आपण वापरू शकतो. जेणे करून फालतू खर्च टाळणे आपल्याला शक्य होते.
डेबिट कार्डचे तोटे
- चोरी आणि फसवणुकीची शक्यता- डेबिट कार्ड चोरी जाऊन जर त्याचा पिन माहिती असेल तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. सोबतच ऑनलाईन किंवा फेक कॉलच्या माध्यमातून डेबिट कार्ड मधून पैसे काढून घेतले जाऊ शकतात.
- जास्तीचे शुल्क- काही बँका ATM चार्ज , SMS चार्ज आणि वार्षिक शुल्क आकारू शकतात.
- अधिक खर्च- काही वेळेस डेबिट कार्ड वापराच्या सुलभतेमुळे खर्चावरील नियंत्रण काढीन जाऊ शकते, आणि जास्त प्रमाणात पैसे खर्च होऊ शकतात.
डेबिट कार्डचा योग्य वापर
- वेळोवेळी बँक स्टेटमेंट तपासात रहा- वेळोवेळी बँक स्टेटमेंट तपासात राहिल्याने तुमचे पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत हे समजण्यास मदत होईल. सोबतच खर्चावर नियंत्रण मिळवण्यातही याचा फायदा होईल.
- तुमच्या कार्डवर SMS सेवा सक्रिय करा- जेणेकरून तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रतेक आर्थिक व्यवहाराचा अलर्ट तुमच्या फोनवर मिळत राहील.
- एटीएम शुल्क टाळा- शक्यतो तुमच्या बँकेच्या एटीएम मध्येच पैसे काढा जेणे करून तुम्हाला लागणारे एटीएम शुल्क किंवा चार्जची बचत होईल. अनेक बँका दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीन मध्ये पैसे काढल्यास काही चार्ज लावतात.
सुरक्षितरित्या डेबिट कार्ड वापरण्याच्या टिप्स
- गोपनीयता- मित्रांनो तुमच्या एटीएम कार्डचा पिन, CVV कधीही कोणाला सांगू नका. डेबिट कार्ड वापरताना आपलं पिन कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या.
- डेबिट कार्ड ब्लॉक करणे– जर कधी तुमचे डेबिट कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर तात्काळ बँकेत संपर्क साधा. बँकेला संपर्क करून लगेच डेबिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.
क्रेडिट कार्डविषयी सविस्तर माहिती
क्रेडिट म्हणजे काय? | Credit meaning in Marathi
मित्रांनो क्रेडिट चा अर्थ संदर्भानुसार बदलतो. पण फायनॅन्स क्षेत्रात क्रेडिट म्हणजे-
- कर्ज/उधार
- जेव्हा एखादी रक्कम उधार दिली जाते किंवा मिळते.
- उदा.: “त्याने बँकेतून क्रेडिट घेतले.”
- खाते शिल्लक (बँकिंग संदर्भात)
- बँक खात्यात जमा झालेली रक्कम.
- उदा.: “तुमच्या खात्यात ₹५००० क्रेडिट झाले आहे.”
क्रेडिट कार्डची संकल्पना व वैशिष्ट्ये
मित्रांनो डेबिट कार्ड प्रमाणेच क्रेडिट कार्डसुद्धा एक इलेक्ट्रोनिक कार्ड आहे. मात्र डेबिट कार्ड प्रमाणे क्रेडिट कार्ड तुमच्या बँक अकाऊंटशी लिंक नसते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँक तुम्हाला एकप्रकारे कर्ज देत असते. फरक फक्त एव्हडाच की हे कर्ज तुमच्या नॉर्मल कर्जासारखे तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होत नाही. याचा वापर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग, बिल पेमेंट यासाठी करू शकता.
बँके तर्फे एक ठराविक लिमिट ठरवून दिली जाते जी तुमच्या क्रेडिट स्कोर वरती आणि तुमच्या क्रेडिट हिस्टरी वर अवलंबून असते.
क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही तेव्हडी रक्कम एका महिन्यात खर्च करू शकता. ही खर्च केलेली रक्कम तुम्हाला पुढच्या महिन्यात एका ठराविक तरखे पर्यन्त बँकेला परत करायची असते.
तसे न केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोर वरती याचा नेगेटिव परिणाम होतो. याबद्दल अधिक माहिती आम्ही सिबिल स्कोर म्हणजे काय या लेखात दिलेली आहे.
मित्रांनो डेबिट कार्ड प्रमाणे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएम मधून पैसे काढू शकता. मात्र येथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात चार्ज द्यावा लागतो. म्हणून असे शकतो खूपच अडचण असेल तरच करा.
क्रेडिट कार्ड कसे मिळवावे?
क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी, खालील मुद्दे लक्षात घ्या.
क्रेडिट कार्डसाठीची पात्रता:
- तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला पगार असणे गरजेचे आहे. अथवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असणे गरजेचे असते.
- या सोबतच तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला असणे खूप महत्वाचे आहे.
अर्ज करताना विचारात घेण्याचे मुद्दे:
- तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या वेबसाइटवरून क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावे लागतील, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला.
- यासोबतच तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा किंवा व्यवसायाचा पुरावा देखील जमा करावा लागू शकतो.
कार्ड मंजूर होण्याची प्रक्रिया:
- बँक तुमचा अर्ज तपासेल आणि सोबत तुमचा क्रेडिट स्कोर योग्य आहे का हे तपासले जाईल.
- तुमची पात्रता तपासल्यानंतर, बँक तुमचा अर्ज मंजूर करेल किंवा नाकारेल.
- क्रेडिट कार्ड मंजूर झाल्यास, कार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.
क्रेडिट कार्ड निवडताना विचारात घेण्याच्या गोष्टी:
- वार्षिक शुल्क: बँक ते बँक वार्षिक शुल्क बदलू शकते. काही बँका क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास वार्षिक शुल्का पासून सूट देतात.
- व्याज दर: तुम्ही जे क्रेडिट कार्ड निवडत आहात त्याचा व्याज दर किती आहे हे तपासून घ्या.
- ऑफर्स आणि फायदे
- क्रेडिट मर्यादा: क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा तुमच्या क्रेडिट स्कोर वरती ठरत असते.
- तुमच्या गरज: तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर कश्यासाठी करणार आहात त्यानुसार योग्य क्रेडिट कार्ड निवडा.
क्रेडिट स्कोअरचे महत्त्व
मित्रांनो याबद्दल सर्व माहिती आम्ही आमच्या सिबिल स्कोर म्हणजे काय या लेखात देलेली आहे.
क्रेडिट कार्डचे फायदे व तोटे
क्रेडिट कार्डचे फायदे
- वापरण्यास सोईस्कर- छोटे छोटे आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर सोईचा ठरतो. यातून तुम्हाला पैसे कॅश च्या स्वरूपात बाळगण्याची गरज पडत नाही.
- विविध ऑफर्स– मित्रांनो कुठली पण ऑनलाईन शॉपिंग सेल आली की क्रेडिट कार्ड ऑफर्सचा अगदी पाऊसच पडतो. अश्या वेळी तुम्हाला जर एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर तुमची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.
- सुरक्षितता- क्रेडिट कार्ड हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तुम्ही त्याला तात्काळ ब्लॉक करू शकता. सोबतच यासाठी बँके तर्फे विमा ही उपलब्ध करून दिला जातो.
- क्रेडिट स्कोर वाढण्यात मदत- मित्रांनो क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट नियमितरित्या केले पाहिजे.
क्रेडिट कार्डचे तोटे
- वाढीव खर्च- मित्रांनो क्रेडिट कार्ड मुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते.
- वार्षिक शुल्क- एकदा क्रेडिट कार्ड घेतल्या नंतर तुम्हाला त्याचा वार्षिक खर्च द्यावा लागतो. आजकाल काही कंपन्या लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड प्रोवाइड करतात. तरी अश्या वेळी काही छुपे शुल्क तर नाही ना याची पडताळणी करणे गरजेचे असते.
- क्रेडिट स्कोअरवर विपरीत परिणाम- मित्रांनो जर तुम्ही क्रेडिट कार्डचे EMI पेमेंट रेग्युलर नाही केले तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वरती होतो.
- ऑनलाईन फ्रॉडचा धोका- मित्रांनो कार्ड चोरीला जाणे किंवा हरवण्या सोबतच ऑनलाईन धोकाधडीची शक्यता ही क्रेडिट कार्ड वापरा सोबत येते.
क्रेडिट कार्डचा योग्य वापर
मित्रांनो क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून तुम्ही पैशयची बचत करू शकता. आजकाल ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट कार्डवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते.
या सोबतच क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास तुमचा सिबिल स्कोर झपाट्याने वाढण्यास मदत होते.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांमधील फरक
वैशिष्ट्ये | डेबिट कार्ड | क्रेडिट कार्ड |
कार्ड कुठल्या खात्याशी लिंक असते | तुमचे बँक खाते | बँकेकडून मिळणारी क्रेडिट लाइन |
पेमेंट स्त्रोत | तुमच्या बँक खात्यातील पैसे | कर्ज घेतलेले पैसे |
व्याज | नाही | होय (खर्च केलेल्या रक्कमेवर) |
क्रेडिट स्कोअरवर परिणाम | नाही | होय, वेळेवर पेमेंट न केल्यास |
खर्चावरील नियंत्रण | सोपे | कठीण, क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकता |
सुरक्षा | गमावल्यास किंवा चोरी झाल्यास ब्लॉक केले जाऊ शकते | गमावल्यास किंवा चोरी झाल्यास ब्लॉक केले जाऊ शकते, पण खात्यातून पैसे गमावण्याची शक्यता असते |
फायदे | काही डेबिट कार्डवर बोनस आणि ऑफर मिळतात | अनेक क्रेडिट कार्डवर भरभरून बोनस, रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर फायदे मिळतात |
शुल्क | ATM काढणी आणि इतर सुविधांसाठी शुल्क लागू होऊ शकतात | जास्त प्रमाणात वार्षिक शुल्क, व्याज शुल्क आणि इतर शुल्क लागू होतात |
पात्रता | मिळवणे सोपे | चांगला क्रेडिट स्कोअर आणि निश्चित उत्पन्न किंवा व्यवसाय असणे आवश्यक |
वापरासाठी चांगले | दैनंदिन खरेदी आणि रोख रक्कम काढणे | मोठ्या खरेदीसाठी, शॉपिंग आणि प्रवासासाठी |
नमस्कार मित्रांनो,
मी सचिन जगताप , MarketMarathi.com चा संस्थापक. ब्लॉगिंग क्षेत्रात मी मागील ५-६ वर्षांपासून कार्यरत आहे. मला WordPress, SEO, आणि डिजिटल मार्केटिंग याबद्दल अनुभव आहे. आर्थिक विषयांवर वाचन व रिसर्च करणे, तसेच माझ्या गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडणे हे माझे आवडते विषय आहेत.